काठमांडू- नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी चीनला दोन एकशिंगी गेंडे भेट दिले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या एका कार्यक्रमात चीनचे नेपाळमधील राजदूत यू होंग यांच्याकडे हे गेंडे सुपुर्द केले आहेत.भद्रा हा नर आणि रुपसी ही मादी असलेली जोडी नेपाळतर्फे देण्यात आली. नेपाळ सरकारने दोन वर्षांपुर्वी चीनला एकशिंगी गेंड्याच्या दोन जोड्या देण्याचे निश्चित केले होते. त्यातील एक जोडी आता देण्यात आली, त्यानंतर पुढील महिन्यात दुसरी जोडी देण्यात येईल.चीन आणि नेपाळमधील ऐतिहासिक संबंध दृढ होण्यासाठी हे एकशिंगी गेंडे मदत करतील असा विश्वास दोन्ही देशांना वाटतो. ही जोडी चीनच्या स्वाधीन केल्यानंतर चीन त्यांची योग्य काळजी घेईल असे मत नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी व्यक्त केले.काठमांडूतून विशेष विमानातून हे गेंडे चीनला पाठविण्यात येणार आहेत. चीनमधील गाउंगझौ येथील चिमेलाँग सफारी पार्कमध्ये ते ठेवण्यात येतील. यावेळेस नेपाळचे वने आणि पर्यावरण मंत्री शक्ती बहादूर बास्नेत उपस्थित होते. नेपाळने आजवर 26 एकशिंगी गेंडे जगभरातील विविध देशांना भेट म्हणून दिले आहेत. त्यात भारत, अमेरिका, जपान, थायलंड, ऑस्ट्रीया यांचा समावेश आहे. नेपाळमध्ये एकूण 645 एकशिंगी गेंडे असून त्यातील 605 गेंडे चितवनमध्ये आहेत.
नेपाळच्या पंतप्रधानांनी चीनला दिले एकशिंगी गेंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:02 PM