काठमांडू : नव्या घटनेवरून भारतासोबतचे व्यापार नाके बंद करण्यासह निदर्शनांचे सत्र सुरू असतानाही राजकीय पक्षांना मतैक्य घडवून आणता आलेले नसून अशा अनिश्चित स्थितीत नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. देशाची संसद रविवारी नव्या पंतप्रधानांची निवड करणार आहे. कोईराला यांनी राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. संसदेने नव्या पंतप्रधानांची निवड करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कोईराला पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा केवळ एक औपचारिकता आहे. कोईराला यांनी त्यांचा पक्ष नेपाळी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधानपदासाठी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांच्याशी लढत होईल. माजी पंतप्रधान आणि वरिष्ठ पक्षनेते शेर बहादूर देऊबा यांनी कोईराला यांच्या नावाला अनुमोदन दिले. ओली यांच्या नावाचा प्रस्ताव यूसीपीएन माओवादीचे अध्यक्ष प्रचंड यांनी ठेवला होता व राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे अध्यक्ष कमल थापा यांनी त्याला अनुमोदन दिले होते.(वृत्तसंस्था)