काठमांडू : नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी बुधवारी मधेशी नागरिकांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. त्या जानकी मंदिरात गेल्या असता त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर दगड व पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आले. नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनकपूरच्या जानकी मंदिराजवळ हे नागरिक निदर्शने करीत होते. यावेळी चकमकीत २० निदर्शक जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला. विवाह पंचमीनिमित्त दर्शनासाठी विद्यादेवी आल्या तेव्हा तणाव वाढला. त्यांना विरोध करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आले. अनेकांच्या हातात काळे ध्वज होते. नेपाळच्या नव्या राज्यघटनेला मधेशी नागरिकांचा विरोध असून राष्ट्रप्रमुख या नात्याने ते विद्यादेवींसमोर रोष प्रकट करीत होते. त्या गेल्यानंतर लगेचच मंदिर परिसरात पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आला. स्फोटात व्यासपीठाला आग लागली. त्यांच्या वाहनांवरही चहूबाजूंनी दगडफेक झाली. त्या बचावल्या असून सुरक्षा रक्षकांनी कडे करीत त्यांना सुखरूप बाहेर काढले. काठमांडू पोस्टने ही माहिती दिली. (वृत्तसंस्था)
नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष हल्ल्यातून बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2015 1:05 AM