नेपाळमध्ये राजकीय संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीय. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, पुढील २८ तासांत शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांना पुढील पंतप्रधान (Prime Minister of Nepal) केले जावे. यामुळे संसद बरखास्त करणाऱ्या के.पी. ओली यांना मोठा धक्का बसला आहे. (Nepal's Supreme Court has ordered to appoint Sher Bahadur Deuba as Prime Minister within the next 28 hours.)
के.पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या ५ महिन्यांत दुसऱ्यांदा संसदेत बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने नवीन सरकार बनविण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत. २८ तासांच्या आत नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले जावे, असे म्हटले आहे.
नेपाळचे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मे मध्ये नेपाळची 275 सदस्यांची संसद भंग केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा केली होती. राष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्य न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
विरोधकांनी न्यायालयात 30 हून अधिक याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये राष्ट्रपतींचा आदेश चुकीचा असल्याचे म्हटले होते. यामुळे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबायांना पंतप्रधान केले जावे, अशी मागणी त्यांनी या याचिकांद्वारे केली होती. यावर जवळपास १५० खासदारांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.