जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची चौथ्यांदा पंतप्रधानपदाकडे घोडदौड चालली आहे. त्यांच्या लिकूड पक्षाने या निवडणुकीत अनपेक्षित, जबरदस्त विजय मिळवला आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देण्याबाबत त्यांच्या पक्षाने ऐनवेळी बदललेली भूमिका हा नाट्यमय विजय मिळवून देण्यासाठी सहायक ठरली असे मानले जात आहे. जवळपास सर्वच बाबी विरोधात असताना, लिकूड पक्षाला हा मोठा विजय मिळाला आहे, असे नेतान्याहू यांनी विजय दृष्टिपथात येताच सहकाऱ्यांना सांगितले व निकाल जाहीर होण्याआधीच विजयाची घोषणा केली. बहुतांश मतमोजणी पूर्ण झाली असून, १२० सदस्यांच्या इस्रायली संसदेत (नेसेट) नेतान्याहू यांना सर्वाधिक ३० जागा, तर निकटचे प्रतिस्पर्धी इसाक हरझॉग (झियॉनिस्ट युनियन) यांना २४ जागा मिळाल्या. निकालाआधी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार नेतान्याहू यांना या निवडणुकीत विजय मिळणे कठीण होते. पण सर्व मतमोजणी झाल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या लिकूड पक्षाने झियॉनिस्ट आघाडीवर स्पष्ट विजय मिळवला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नाही, पण ६१ जागा जमविण्याची क्षमता फक्त लिकूड पक्षात असल्याने लिकूडला विजयी घोषणा करण्यात आले. (वृत्तसंस्था) नेतान्याहू यांनी लिकूड पक्षाचा हा मोठा विजय असल्याचे जाहीर केले आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात ते सरकार स्थापन करण्याच्या विचारात असून आघाडीच्या पक्षांना वाटाघाटीसाठी निमंत्रित केले आहे. उजव्या विचारसरणीचे पक्ष बेयित येहुदीचा नेता नेफ्ताली बेनेट , कुलानुचे मोशे कोहलान, यिझरायेल बेयातेनूचे प्रमुख अव्हिगडोर लिबरमन यांचा आघाडीत समावेश आहे. नेतान्याहू गेली ९ वर्षे इस्रायलमध्ये सत्तेवर असून, त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषविले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अखेरच्या दिवशी त्यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार नाही, असे जाहीर केले होते व सहा वर्षांच्या आपल्या भूमिकेला सोडचिठ्ठी दिली होती.
नेतान्याहूंना कौल!
By admin | Published: March 18, 2015 11:38 PM