तेल अवीव - गेल्या वर्ष दीड वर्षापासून इस्राइलमध्ये सुरू असलेली राजकीय अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आपले मित्र नेतान्याहू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
इस्राइलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरता होती. येथे तीन वेळा निवडणुका होऊनही कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे काळजीवाहू सरकार कारभार चालवत होते. अखेरीच विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि बेनी गांत्झ यांनी आघाडी करून नवे सरकार स्थापन केले आहे. या आघाडीसाठी झालेल्या वाटाघाटींनुसार बेंजामिन नेतान्याहू १८ महिने तर बेनी गांत्झ १८ महिने पंतप्रधानपद भूषवतील.
आपले सरकार यहुदीवादाच्या इतिहासात एक नवा गरिमापूर्ण अध्याय लिहील. त्यासाठी आपे सरकार पश्चिम किनारपट्टीवरील इस्राइलच्या स्वायत्ततेच्या प्रतीज्ञेसह शपथ घेईल. आता ती वेळ आली आहे. जे इस्राइलच्या जमिनीवरील आमच्या अधिकारांवर विश्वास ठेवतात. त्यांनी माझ्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे नेतान्याहू यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इंग्रजी आणि हिब्रू भाषेतून मोदींनी नेतान्याहू यांना शुभेच्छा दिल्या. माझे मित्र बेंजामिन नेतान्याहू यांना पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा. मी नेतान्याहू आणि बेनी गांत्झ यांना पुन्हा शुभेच्छा देतो. भारत आणि इस्राइलमधील रणनीतिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या सरकारसोबत मिळून काम करू.