India Greece Pm Modi: भारत आणि ग्रीसमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस आजपासून दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान यांच्यात आज दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी किरियाकोस मित्सोटाकिस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.
आज ग्रीसच्या पंतप्रधानांचे राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आले. यासोबतच पंतप्रधान मित्सोटाकिस यांनीही राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यादरम्यान भारत-ग्रीस संबंधांबाबत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मित्सोटाकिस यांच्यात चर्चा झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोदींनी ग्रीसला भेट दिली होती. पंतप्रधानांच्या ग्रीस भेटीदरम्यान, भारत-ग्रीस संबंध पुढे नेण्यासाठी चर्चा झाली होती. आज पंतप्रधान मित्सोटाकिस यांच्या या भेटीदरम्यान भारत आणि ग्रीस यांच्यात व्यापार, कृषी, फार्मा, वैद्यकीय, अंतराळ आणि संरक्षण या विषयांवर करार झाला आहे. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांनी जगातील इतर देशांशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली.
भारत-ग्रीस यांच्यातील मजबूत 'कनेक्टिव्हिटी'वर चर्चा
पत्रकार परिषदेत माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, भारत आणि ग्रीस यांच्यातील मजबूत कनेक्टिव्हिटीच्या व्यापक संदर्भात चर्चा झाली. ही कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करण्यासाठी ही चर्चा झाली. याशिवाय, भारत-मध्य-पूर्व युरोप कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटीचा एक भाग असलेल्या बंदरांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यावरही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. भूमध्यसागरीय तसेच इंडो पॅसिफिकमध्ये भागीदारी निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली. भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉरच्या संदर्भात आमचे सहकार्य कसे वाढवायचे यावर त्यांनी चर्चा केली.