बिजिंग - सध्या चीनमधील रुग्णालये रुग्णांनी खचून भरलेली दिसत आहेत. सरकार आकडे लपवत असले तरी, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंवरून तेथील वास्तविक परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून चीनमधील सध्याची स्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येऊ शकते. व्हिडिओमध्ये व्हीलचेअरवर बसलेले काही रुग्ण मृतदेहांपासून काही अंतरावरच दिसत आहेत. कथितपणे चीनची राजधानी बिजिंगच्या एका रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाने हा व्हिडियो तयार केला होता. यात काही लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. या रुग्णालयात रुग्णांची गर्दीही दिसत आहे.
मृतदेहांशेजारी बसलेले दिसले रुग्ण -चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक छोटी क्लिप देशाची बिकट आरोग्य व्यवस्था दर्शवते. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी कथितपणे बिजिंगमधील चुइयांगलू रुग्णालयात रेकॉर्ड करण्यात आला होता. जेथे कोविड आणि सामान्य रूग्णांवर उपचार केले जात आहेत. फुटेजमध्ये मास्क लावलेला आणि पांढरी चादर गुंडाळून बसलेला एक रुग्ण मृतदेहाजवळ व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे. त्याच्या जवळच बेडवर एक मृतदेह दिसत आहे, तर इतर मृतदेह रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये फरशीवर विखुरलेले दिसत आहेत.
रुग्णालयाबाहेर मोठमोठ्या रांगा - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे, की रुग्णालय मृतदेह आणि स्ट्रेचर, व्हीलचेअरवर बसलेल्या रुग्णांनी भरलेले आहे. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोविड प्रकरणांच्या वाढीमुळे चीनची आरोग्य यंत्रणा पार कोलडमडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माध्यामांमधील वृत्तांनुसार, चीन सध्या 'थर्मोन्यूक्लियर कोविड उद्रेका'चा सामना करत आहे. तसेच येणाऱ्या 90 दिवसांत देशातील 60 टक्के जनता अर्थात 80 कोटी लोक कोरोना संक्रमित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.