बीजिंग: चीनमधील बहुतांश शहरांमधील सुपरमार्केट्समध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. घाबरलेले लोक जास्तीत जास्त सामान खरेदी करण्यासाठी तासनतास सुपरमार्केट्समध्ये उभे आहेत. अचानक मागणी वाढल्यानं बाजारांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बाजारांत धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत.
अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश चीन सरकारनं काही दिवसांपूर्वी दिले. त्यानंतर चिनी जनता चिंतेत पडली. कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. थंडीच्या मोसमात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
सरकारकडून सूचना देण्यात येताच सुपरमार्केट्समध्ये गर्दी उसळली. लोक गरजेपेक्षा अधिक सामान खरेदी करू लागले. मागणी अचानक वाढल्यानं कंपन्यांना उत्पादनांचा पुरवठा करणं अवघड जाऊ लागलं आहे. आर्मी बिस्कीट्स आणि लंच मीलसाठी सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे. अलिबाबाच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर तांदूळ, सोया सॉस, चिली सॉसची मागणी वाढली आहे. लोकांना या वस्तू वेळेवर मिळत नाहीत. दुकानांमधील साठा संपला आहे.
तैवानसोबत युद्धाची तयारी?अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश सरकारनं देताच लोकांमध्ये घबराट पसरली. चीन तैवानसोबत युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे. त्यामुळेच अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचा काहींचा अंदाज आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे.