लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अंतिम दिवसाशी निगडित माहिती संकलित करण्यासाठी ब्रिटनमध्ये सुरू करण्यात आलेल्या एका वेबसाईटने नवीन दस्तावेज जारी केले आहेत. विमान अपघातात त्यांचा ‘कथित’ मृत्यू झाल्यानंतर ते चीनमध्ये दिसल्याचा दावा फेटाळून लावणारी ही कागदपत्रे आहेत.डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट बोस फाईल्स डॉट इन्फोने बीजिंगमध्ये भारतीय दूतावासाद्वारे पाठविण्यात आलेल्या टेलिग्रामची एक प्रत जारी केली आहे. नेताजी १९५२ मध्ये चीनच्या राजधानीत होते, असा दावा भारतात केला जातो. तो दावा फेटाळून लावणारा हा टेलिग्राम आहे.१९४५ मध्ये तैवान येथे झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते; पण त्यांचे एक पक्के समर्थक एस. एस. गोस्वामी यांनी १९५५ मध्ये एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. ‘नेताजींशी संबंधित रहस्यांचा भंडाफोड’ असे या पुस्तिकेचे नाव आहे. त्यात मंगोलियाच्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चिनी अधिकाऱ्यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. हे छायाचित्र १९५२ चे असून छायाचित्रात दिसणाऱ्या लोकांत नेताजी आहेत, असा दावा गोस्वामी यांनी केला होता. नेताजींच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका समितीसमोर ते साक्षीदार म्हणून पेश झाले आणि नेताजी जिवंत आहेत, असा दावा करण्यासाठी ते छायाचित्र सादर केले. खरे तर नेताजी १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघातात मरण पावल्याची त्यावेळी चर्चा होती.वेबासाईटची स्थापना करणारे लंडनस्थित पत्रकार आशिष रे म्हणाले की, नेताजींबाबत गेल्या ७० वर्षांपासून चुकीची माहिती पसरविण्यात येत असून, हा टेलिग्राम त्याचाच एक भाग आहे. नेताजींबाबत पुरावे जारी करण्यासाठी ही वेबसाईट स्थापन करण्यात आली आहे. बोस १९४५ मध्ये सोविएत युनियनमध्ये गेले होते, असा दावा फेटाळून लावणारे दस्तावेज या वेबसाईटने ७ डिसेंबर २०१५ रोजी जारी केले होते. १९४५ किंवा त्यानंतर नेताजी सोविएतमध्ये गेल्याची कुठलीही माहिती केजीबीच्या कागदपत्रात नाही, असे सोविएततर्फे स्पष्ट करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
ब्रिटिश वेबसाईटने जारी केले नेताजींबाबत नवीन दस्तावेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2016 2:50 AM