नवी दिल्ली: परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेतनं सुरू केली आहे. त्यामुळे देशातील परदेशी कामगारांच्या संख्येत कपात होईल. या विधेयकाच्या मसुद्याला कुवेतच्या संसदेत मंजुरी मिळाली आहे. हा मसुदा पूर्णपणे घटनेला धरून असल्याचं विधेयक समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच कुवेतच्या संसदेत अप्रवासी कोटा विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.अप्रवासी कोटा विधेयक आणखी एका समितीकडे जाणार आहे. मात्र यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ७ ते ८ लाख भारतीयांवर नोकरी गमावण्याची वेळ येईल. कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी व्यक्तींची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कुवेतची लोकसंख्या ४८ लाख इतकी आहे. यातील भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर यापैकी १५ टक्केच लोकांना कुवेतमध्ये राहता येईल. त्यामुळे ७ ते ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागेल. भारतीयांसोबतच इतर देशांमधून कुवेतमध्ये काम करण्यास गेलेल्या व्यक्तींनादेखील याचा फटका बसेल. इजिप्तमधून आलेल्या व्यक्तींची संख्या ९० टक्क्यांनी कमी करण्याची तरतूद मसुद्यात आहे. भारतीयांनंतर कुवेतमध्ये इजिप्तच्या व्यक्तींचं प्रमाण सर्वाधिक आहे.कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी गेलेले भारतीय त्यांच्या कुटुंबाना मोठ्या प्रमाणात पैसा पाठवतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळतं. २०१८ मध्ये कुवेतमधून भारतात ४.८ बिलियन डॉलर इतकी रक्कम पाठवली गेली. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास परकीय चलनाच्या गंगाजळीवर परिणाम होईल. कुवेतमधील परदेशी व्यक्तींची संख्या वाढल्यानं देशात मूळ कुवेती व्यक्तींची संख्याच कमी झाली आहे. त्यामुळे कुवेती त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. ही बाब समोर आल्यानं कुवेतनं अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कुवेतनं प्रयत्न सुरू केले आहेत. कुवेतची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. त्यामध्ये परदेशातून आलेल्या लोकांचं प्रमाण ३० लाख इतकं आहे.
चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 10:40 AM
विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; कामासाठी गेलेल्या भारतीयांची चिंता वाढली
ठळक मुद्देकुवेतमध्ये अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरीलवकरच अप्रवासी कोटा विधेयकही मंजूर होण्याची शक्यताविधेयक मंजूर झाल्यास ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार