बेन गुरियन - भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतातून इस्राइलला जाणाऱ्या आणि इस्राइलहून भारताकडे जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे संकेत सौदी अरेबियाने हल्लीच दिले होते. एअर इंडियाचे 139 विमान तब्बल साडे सात तासांचा प्रवास करून गुरुवारी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या धोरणात आलेला हा मोठा बदल आहे. इराण आणि सौदी अरेबियामध्ये असलेले तणावपूर्ण संबंध हे सौदीच्या इस्राइलकडे झुकण्याचे कारण मानले जात आहे. "हा खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर हे शक्य झाले आहे,"अशी प्रतिक्रिया इस्राइलचे पर्यटनमंत्री यारिव लेविन यांनी दिली. लेविन म्हणाले, "सौदीच्या आकाशातून भारतीय विमानांची ये जा वाढल्याने प्रवासातील वेळ कमी होईल. त्यामुळे प्रवासातील वेळ सुमारे दोन तासांनी कमी होईल. याशिवाय तिकिटांचे दरही कमी होतील." ज्यू बहुसंख्य असलेल्या इस्राइलला इस्लामिक देशांकडून राष्ट्राचा दर्जा मिळालेला नाही. मात्र सध्या सौदी अरेबियाने दिलेली सवलत ही केवळ भारतीय विमानांसाठी आहे. इस्राइली विमानांसाठी अशी सवलत देण्याचे कोणतेही संकेत सौदीकडून देण्यात आलेले नाहीत.
नवा इतिहास : सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 10:29 AM