अफगाणिस्तानाततालिबानीमहिलांसाठी नवीन कायदा लागू केला आहे. याठिकाणी महिलांवर कठोर निर्बंध लावत त्यांना घराबाहेर बोलण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी नेहमी शरीर आणि चेहरा मोठ्या कपड्याने झाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. हा कायदा आणण्यामागचं कारण म्हणजे महिलांच्या आवाजानेही पुरुषांचे मन विचलित होऊ शकतं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बोलण्यावरही बंदी आणली आहे असं इंग्रजी वृत्तपत्र द गार्जियननं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबातुल्लाह अखुंदजादा यांनी नव्या कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्याला हलाल आणि हराम या २ भागात विभागलं गेले आहे. तालिबानच्या या कायद्याची संयुक्त राष्ट्र संघाने कठोर निंदा केली आहे. मानवाधिकार संघटनांनीही या कायद्यातील तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. तालिबाननं महिलांना घरात गाणे म्हणायला आणि जोरात आवाजात वाचण्यासही मनाई केली आहे. ज्या महिला किंवा मुली या कायद्याचे पालन करणार नाही, त्या दोषी आढळल्या तर त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे.
तालिबाननं नव्या कायद्यात महिलांशिवाय पुरुषांवरही काही बंधने आणली आहेत. पुरुषांनाही घराबाहेर पडताना गुडघ्यापर्यंत शरीर लपवण्याचे आदेश दिलेत. कुठल्याही जिवंत व्यक्तीचे फोटो काढण्यावरही तालिबाननं बंदी आणली आहे. १५ ऑगस्ट २०२१ ला अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती गेली. त्यादिवशीपासून महिलांवर निर्बंध सुरू झाले आहेत. सर्वात आधी विविध सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यानंतर महिलांच्या शिक्षणावर बंदी आणली. अफगाणिस्तानात महिला सहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकत होत्या.
तालिबान सत्तेत आल्यापासून अनेक कायदे तयार केलेत. त्यावरून मानवाधिकार संघटनांनी विरोध केला. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देणे. तालिबानात अशा २ घटना घडल्यात जेव्हा सार्वजनिक ठिकाणी शिक्षा दिली गेली. तालिबानात या वर्षीच्या जूनमध्ये समलैंगिक संबंध बनवणाऱ्या आरोपाखाली ६३ लोकांना चाबकाने फटके दिले. त्यात १४ महिलांचाही समावेश होता. समलैंगिकता इस्लामविरोधात मानली जाते. यातील दोषींना सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या उपस्थितीत फटके मारले. तर दुसऱ्या घटनेत तालिबाननं यावर्षी मार्चमध्ये महिलांविरोधात फर्मान जारी केले होते. त्यात अवैध संबंध बनवणाऱ्या महिलांची दगडानं ठेचून हत्या करण्याची शिक्षा होती.
अफगाणिस्तानात शरिया कायदा
तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करून देशात शरिया कायदा लागू केला. शरिया हे इस्लामला मानणाऱ्या लोकांची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. अनेक इस्लामी देशात याचा वापर केला जातो. परंतु पाकिस्तानसह बहुतांश इस्लामी देशात हा कायदा पूर्णत: लागू नाही. शरियामध्ये कौटुंबिक, आर्थिक, व्यवसायनिगडित कायदे आहेत. दारू पिणे, नशा करणे, तस्करी करणे यासाठी शरिया कायद्यात कठोर शिक्षा दिली जाते.