न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमध्ये नुकतीच भीषण गोळीबाराची(New York Firing) घटना घडली होती. ब्रुकलीनमधील सबवे स्टेशनवर एका व्यक्तीने 10 जणांवर बेछूट गोळीबार केला होता. आता त्या घटनेतील संशयित आरोपीच्या न्यूयॉर्क पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. घटनेच्या अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात आली.
अमेरिकन मीडियाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँक जेम्स(वय 62) असे या घटनेतील संशयिताचे नाव आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मॅनहॅटनमधील रस्त्यावर पाहिले आणि तिथेूनच ताब्यात घेतले. महापौर एरिक अॅडम्स यांनी पत्रकार परिषदेत आरोपीच्या अटकेची घोषणा केली. न्यूयॉर्क पोलिस विभागाचे प्रमुख कीचांत सेवेल यांनीही आरोपीच्या अटकेची पुष्टी केली आहे.
नेमकं काय झालं?अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एका नारिंगी कपड्यांमध्ये आलेल्या व्यक्तीने प्रवाशांवर गोळीबार केला. यात 10 जणांना गोळ्या लागल्या असून 13 जण जखमी झाले. घटनास्थळावरुन न फुटलेले स्फोटकही ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्लेखोर चेहऱ्यावर गॅस मास्क घालून आला होता, त्याने प्रवाशांना पाहताच गोळीबार सुरु केला. यामुळे एकच धावपळ उडाली. हल्लेखोराने आधी धूर निर्माण केल्याने प्रवाशांना पळून जाता आले नाही.