अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर सकाळी साडेआठच्या सुमारास मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये एका नारिंगी कपड्यांमध्ये आलेल्या व्यक्तीने प्रवाशांवर गोळीबार केला. यात पाच जणांना गोळ्या लागल्या असून १३ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर पळून गेल्याने सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून न फुटलेले स्फोटकही ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्लेखोर चेहऱ्यावर गॅस मास्क घालून आला होता. त्याने प्रवाशांना पाहताच गोळीबार सुरु केला. यामुळे एकच धावपळ उडाली. स्फोटकांचे आवाजही ऐकू आले. धुरही बाहेर दिसत होता. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले होते. हल्लेखोराने आधी धूर निर्माण केल्याने प्रवाशांना पळून जाता आले नाही. ऑरेंज कलरच्या पोषाखात असल्याने तो विकास कामांवरील कर्मचारी असल्याचे अनेकांना वाटले. परंतू त्याच्या वेशात हल्लेखोर होता. धूर निघू लागल्याने अग्निशमन दलाला बोलविण्यात आले, याचसोबत पोलिसांनाही खबर देण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून संपूर्ण न्यूयॉर्क शहरात सबवे मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. लोकांना काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.