न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किना-यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचा-यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडले. या घटनेमुळे धावपळ उडाली असता येथील एका गाडीतून गोळीबार सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्याकडील असलेला शस्त्रसाठा जप्त केला असून पुढील तपास सुरु केला आहे. याचबरोबर, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील हल्ला हा आजारी आणि माथेफिरू व्यक्तीकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, इसिस या दहशतवादी संघटनेला अमेरिकेत येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.