न्यूझीलंड सरकारनं मंगळवारी मोठा निर्णय घेत देशात कमीत कमी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. इतर देशांमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहतो आहोत, कोरोना विरोधात लढा दिला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आपल्याकडे आता फक्त एकच संधी आहे, असं जेसिंडा म्हणाल्या.
न्यूझीलंडमध्ये नव्यानं आढळलेला रुग्ण ऑकलंड येथील रहिवासी असून त्यानं कोरोमंडेलचा दौरा केला होता. या दोन्ही ठिकाणी आता तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांनी संक्रमणाचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच सुपरमार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारीत सापडला होता शेवटचा रुग्णदरम्यान, न्यूझीलंडमधील सर्वात मोठं शहर असलेल्या ऑकलंडमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर आज न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळला आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण कशी झाली याचा तपास सध्या सुरू आहे. न्यूझीलंडमध्ये फेब्रुवारी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता.
ऑकलंडचं स्थानिक आरोग्य प्रशासन सध्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून माहिती गोळा करत असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑकलंडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं खूप कठीण जात असल्याचं देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पण अशा ठिकाणी नागरिकांनी मास्कचा काटेकोरपणे वापर करायला हवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.