ऑनलाइन लोकमत
वेलिंटन, दि. 18 - जगात एकूण सात खंड आहेत, आणि ते सर्व आपल्याला माहिती आहेत असं तुम्ही समजत असाल तर थांबा...कारण शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या दाव्यानुसार या सात खंडाव्यतिरिक्त अजून एक आठवा खंड असून तो पुर्णपणे पाण्याखाली झाकला गेला आहे, ज्याची माहिती किंवा ओळख अद्याप स्पष्ट झालेली नव्हती. द इंडिपेंडंट वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा खंड न्यूझीलंड देशाच्या खाली असून पुर्णपणे पाण्याने झाकला गेला आहे.
जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका जर्नलने छापलेल्या रिपोर्टनुसार झीलँडिया नावाचा हा आठवा खंड आहे, ज्याचं क्षेत्रफळ 50 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं आहे. म्हणजेच ऑस्टेलियाच्या दोन तृतियांश इतकं आहे. झीलँडियामध्ये त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका खंडात पाहिल्या जातात असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या खंडाचा 94 टक्के दक्षिण प्रशांत महासागराखाली बुडालेला आहे.
न्यूझीलंडचे उत्तर आणि दक्षिणेकडील बेट आणि न्यू कॅलिडोनियाचा उत्तर भाग मिळून हा खंड तयार झाला आहे. हा खंड पाण्याखाली असल्याने यासंबंधीची आकडेवारी आणि माहिती गोळा करणं कठीण होणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
पृथ्वीवरील सात खंडांची नावे पुढीलप्रमाणे-
१. आशिया खंड, २. आफिका खंड, ३. उत्तर अमेरिका, ४. दक्षिण अमेरिका, ५. अंटार्क्टिका, ६. युरोप, ७. ऑस्ट्रेलिया.
आशिया हा सर्वांत मोठा खंड असून, क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याने पृथ्वीचा १/३ भाग व्यापलेला आहे. त्याचप्रमाणे हा सर्वांत जास्त लोकसंख्येचा खंड आहे.
पृथ्वीचे क्षेत्रफळ ५१०.०७२ लक्ष चौरस किलोमीटर असून, त्याचा ७०.९२ प्रतिशत भाग पाण्याने, तर २९.०८ प्रतिशत भाग जमिनीने व्यापला आहे