न्यूझीलॅंडच्या क्राइस्टचर्चमध्ये गेल्या काही दिवासांपूर्वी मशिदीवर झालेल्या हल्ल्यात गोळीबार झाला. ज्यात ५० लोक मारले गेले होते. या हल्ल्यानंतर न्यूझीलॅंडमधील मुस्लिम घाबरलेले आहेत. त्यांची हीच भीती बाहेर काढण्यासाठी न्यूझीलॅंडच्या महिलांनी एक उत्तम पाऊल उचललं आहे. यावर ट्रेन्ड सुरू असून याला #headscarfforharmony असं नाव देण्यात आलं आहे. या उपक्रमात न्यूझीलॅंडच्या महिला मुस्लिम समुदायाच्या समर्थनात हिजाब परिधान करत आहेत. सोबतच आपले फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत.
कुणी केली कॅम्पेनची सुरूवात?
रिपोर्टनुसार, या कॅम्पेनची सुरूवात ऑकलॅंडच्या डॉक्टर Thaya Ashman यांनी केली. त्यांना असं कळालं होतं की, मुस्लिम महिला फार जास्त घाबरलेल्या आहेत की, जर त्या घराबाहेर हिजाब घालून गेल्या तर दहशतवादी त्यांना ठार करतील. हीच त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी Thaya यांनी हा उपक्रम सुरू केला.
Thaya यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'मला त्यांना हेच सांगायचे आहे की, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मला हे वाटतं की, तुम्ही रस्त्याला तुमचं घर समजा, आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही तुमचं समर्थन आणि तुमचा सन्मान करतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मुस्लिम समुदायाला हे सांगायचं आहे की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत'.