काबूल : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कुंदूज शहरातील १९ जण ठार झाल्यानंतर वैद्यकीय मदतीचे काम करणाऱ्या ‘मेडिसिन्स सॅन्स फ्रँटियर्स’ (एमएसएफ) या स्वयंसेवी संस्थेने काम थांबविले आहे. या हल्ल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी खेद व्यक्त केला असून, झाल्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.शनिवारी पहाटे अमेरिकी विमानांनी हा हल्ला केला होता. या शहरावर तालिबानने नियंत्रण मिळविले असून, ते शहर मुक्त करण्यासाठी अफगाण सैनिक व अमेरिकेने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. हवाई हल्ला झाला त्यावेळी इस्पितळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण होते. ‘एमएसएफ’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजून १० मिनिटांनी हा हल्ला झाला. त्यात १९ जण ठार आणि अन्य ३७ जण जखमी झाले. हल्ला होताच अफगाण अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली; पण त्यानंतरही ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ बॉम्बफेक होत होती.दरम्यान, या घटनेबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी पेंटॅगॉनला दिले आहेत. वॉशिंग्टन येथे बोलताना ओबामा म्हणाले की, चौकशी करून माहिती देण्यास मी संरक्षण विभागाला सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
हल्ल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने काम थांबविले
By admin | Published: October 04, 2015 11:28 PM