नायजेरियामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. उत्तरेकडील राज्य जिगावा येथे पेट्रोल घेऊन जात असलेल्या टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं होतं. टँकर उलटल्यानंतर त्यात असलेलं पेट्रोल रस्त्यावर सांडलं, त्यानंतर भीषण स्फोट झाला. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या दुर्घटनेत तब्बल १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस आणि राज्य आपत्कालीन सेवांनी देखील या दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे. जिगावा राज्य आपत्कालीन सेवा प्रमुख हारुना मॅरिगा यांनी या अपघातात १४७ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. पेट्रोल घेऊन जात असलेला टँकर उलटल्याने त्यातील पेट्रोल रस्त्यावर सांडलं. ते गोळा करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली. त्याच दरम्यान भीषण स्फोट झाला. यामुळे लोकांना जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काही जण यामध्ये जखमी देखील झाल्याची माहिती मिळत आहे.
रिपोर्टनुसार, स्थानिक पोलिस प्रवक्ते लावान शिसू एडम यांनी सांगितलं की, "टँकर प्राचीन शहर कानोपासून उत्तरेला असलेल्या योबे राज्याच्या दिशेने जात होता. राजधानी अबुजापासून हे जवळपास ५३० किलोमीटरवर असताना तौरा स्थानिक सरकारी क्षेत्राजवळील माजिया शहराजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. ज्यामुळे टँकर उलटला आणि पेट्रोल रस्त्यावर सांडलं."