अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत न्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी त्यांना कडवी टक्कर दिली.
आयोवा कॉकसनंतर निक्की हेली यांना पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करावा लागला आहे. मात्र निक्की हेली यांनी शर्यत अजून संपलेली नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना निक्की हेली म्हणाल्या की, विजय आणि पराभव दोन्ही दूर आहेत. अजून अनेक राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुका होणे बाकी आहेत. त्यामुळे पुढील निवडणूक माझ्या राज्यात दक्षिण कॅरोलिनामध्ये होईल.
न्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणुकीत एकूण ७५ टक्के मतदान झाले. त्यापैकी डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास ५४.४ टक्के मते मिळाली आणि निक्की हेली यांना ४३.३ टक्के मते मिळाली. दरम्यान, आयोवा कॉकसनंतर न्यू हॅम्पशायरची प्राथमिक निवडणूक जिंकून डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्याचा दावा बळकट केला आहे.
नुकत्याच झालेल्या आयोवा कॉकस निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ऐतिहासिक विजय मिळाला होता. आयोवा कॉकसमधील ९९ काउंटीमध्ये त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती. केवळ एका काउंटीमध्ये त्यांचा एका मताने पराभव झाला. दरम्यान, आयोवा कॉकसमध्ये १२ पेक्षा जास्त गुणांची आघाडी कोणीही घेऊ शकले नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० टक्क्यांच्या फरकाने आघाडी घेतली आणि पूर्ण बहुमताने विजय मिळवला. अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही प्रमुख पक्षांनी मोठी तयारी केली आहे.