अहमदनगर: स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून निला विखे-पाटील यांची निवड झाली आहे. निला या प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या, तर केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. स्वीडनच्या पंतप्रधान पदाची धुरा गेल्याच महिन्यात स्टिफन लोफवन यांनी हाती घेतली. त्यांच्या सल्लागार म्हणून निला काम करतील. स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रॅट-ग्रीन पार्टीचं सरकार आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे स्टिफन लोफवन यांच्याकडे या सरकारचं नेतृत्व आहे. आता त्यांच्या सल्लागार म्हणून 32 वर्षांच्या निला विखे-पाटील काम पाहतील. त्या अर्थ विभागाशी संबंधित विभागांवर काम करतील. कर, अर्थसंकल्प, गृहनिर्माण या संबंधित विषय त्या हाताळतील, अशी माहिती निला यांच्या वडिलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. याशिवाय स्टॉकहॉम महानगपालिकेच्या परिषदेवरही त्यांची निवड झाली आहे. स्टॉकहॉम स्वीडनच्या राजधानीचं शहर आहे. निला यांनी याआधीच्या सरकारच्या सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. त्या ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य आहेत. स्टॉकहॉम ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीच्या सदस्य मंडळातही त्यांचा समावेश आहे. निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. त्या सुरुवातीला काही काळ महाराष्ट्रात वास्तव्याला होत्या. त्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. निला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी घेतली आहे. अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. निला या स्वीडिश यंग ग्रीन्स, ग्रीन पार्टी गोथेनबर्ग, ग्रीन स्टुडंट्स ऑफ स्वीडनच्या सदस्य आहेत. याशिवाय ग्रीन पार्टी स्टॉकहॉमचं सदस्यत्वही त्यांच्याकडे असल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं.
अभिमानास्पद! स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी निला विखे-पाटील यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:49 AM