नवी दिल्ली : बँकांना ठकवून परदेशात पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या बाबत इग्लंडने नरमाईची भुमिका घेतली आहे. भारताकडूनइंग्लंडला देण्यात आलेले पुरावे नीरव मोदीला दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्य़ाची शक्यता आहे. या पुराव्यांमध्ये तपास, साक्षी असतात.
ब्रिटीश अधिकाऱ्यांनी याबाबत भारतीय तपास संस्थांना कळविले आहे. याचबरोबर नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटींची रक्कम इंग्लंडमध्ये जमा केलेली नसल्याचेही सांगितले आहे. जर हे कागदपत्र नीरव मोदीला दिल्यास तो या कागदपत्रांचा वापर त्याच्या बाजुने लढण्यासाठी करू शकतो. यामुळे भारतीय तपास संस्थांनी ब्रिटनकडे आक्षेप नोंदवला आहे.
यूके सीरियस फ्रॉड ऑफिस (एसएफओ) ने भारताला याबाबतचे पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी भारताकडे पीएनबी घोटाळ्याबाबतची माहिती मागविली होती. किती रुपयांचा घोटाळा, त्याच्या संपत्तीवरील जप्तीची कारवाई, घोटाळ्यातल किती रक्कम इंग्लंडमध्ये वळती केली, घोटाळ्यात कोणकोण सहभागी आहेत याबाबत विचारणा केली होती. तसेच इंग्लंडमधील कायद्यामध्ये आरोपीला पुरावे, साक्षींची माहिती देण्याचीही तरतूद आहे. यामुळे हे कागदपत्र नीरव मोदीला दाखविण्यात येतील, असेही या पत्रात नमूद केले आहे.
पीएनबी घोटाळ्यातील रक्कमेला दुबई, हाँगकाँग आणि युएईला वळविण्यात आल्याची शक्यता आहे. युरोपशी याचा काहीही संबंध नाही. जर तसे पुरावे असतील तर ते सादर करावे लागतील, असा इशाराही एसएफओने भारताला दिला आहे. हे सर्व नीरव मोदीच्या प्रत्यार्पण खटला सुरु होण्यापूर्वी भारताला द्यावे लागणार आहे.