लंडन : पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या साह्याने तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे नक्की झाले आहे. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात पराभव झाला आहे. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपात तथ्य असल्यामुळेच नीरव मोदीला भारतातील न्यायालयात उभे राहावेच लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही न्यायालयाने म्हटले. खटल्याचा निकाल सुनावण्यात आला, तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नीरव माेदी उपस्थित होता. पण निकालानंतरही तो अतिशय निर्विकार होता. निकाल ऐकून त्याच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी निकालाचा काही भाग न्यायालयात वाचून दाखविला. ते म्हणाले की, आपण पूर्ण निकालपत्र गृहमंत्र्यांकडे (सेक्रेटरी ऑफ स्टेट) पाठवत आहोत.
आर्थर रोड तुरुंगात
नीरव मोदी याच्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील १२ क्रमांकाची बराक ही योग्य जागा आहे, तिथे त्याच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि आत्महत्या करण्यास तिथे वावही नसेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.