टोकियो : इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात आम्ही नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले. मध्य पूर्वेत अमेरिकेने सैन्य तैनात केल्यामुळे उभय देशांत तणाव वाढलेला असताना त्यांनी वरील विधान केले. यावेळी त्यांच्यासोबत जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे होते.ट्रम्प सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात नाही हे मला स्पष्ट करू द्या. अण्वस्त्रे नसावीत हे आम्हाला हवे आहे. इराणला दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही.’ इराणच्या धमक्यांना शह देण्यासाठी आम्ही मध्य पूर्वेत अतिरिक्त १५०० सैन्य तुकडी तैनात करीत आहोत, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. उभय देशांत लष्करी तणाव वाढत जात असताना तुकड्या तैनात होत आहेत. इराणसोबत गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय अणू करारातून अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केल्यापासून व इराणवर पुन्हा निर्बंध लादल्यामुळे या दोन्ही देशांत तणाव वाढतो आहे. ‘इराणसोबतचा तो भयानक करार’ असल्याची आपली टीका ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा करताना मी पुन्हा नव्या वाटाघाटींसाठी तयार आहे. आम्ही करार करू, असे म्हटले. त्याआधी ट्रम्प म्हणाले होते की,‘ इराणला चर्चा करायला आवडेल असा मला विश्वास आहे आणि त्याची तशी तयारी असेल तर आम्हीही तयार आहोत.’ ट्रम्प यांनी जपानमध्ये महत्त्वाच्या विषयावरील चर्चेत उत्तर कोरियाबाबतही असाच सलोख्याचा सूर लावला आहे. उत्तर कोरिया हा फारच मोठा धोका असल्याची अमेरिकेची भूमिका आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांच्यासोबत ट्रम्प यांनी यापूर्वी दोन फेऱ्यांत चर्चा केली होती. (वृत्तसंस्था)
इराणची राजवट बदलण्याचा प्रयत्न नाही : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:13 AM