इस्लामाबाद : पाकिस्तानी आणि काश्मिरी हे एकच लोक असून, पाकिस्तान यापुढेही काश्मिरींच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ आल्वी यांनी देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारंभात भाषण करताना बुधवारी सांगितले.‘असोशिएटेड प्रेस आॅफ पाकिस्तान’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाविरुद्ध पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागेल, याचा पुनरुच्चार करून अल्वी म्हणाले की, भारताने हा निर्णय घेऊन केवळ सुरक्षा परिषदेच्या ठरावाचेच नव्हे, तर सिमला कराराचेही उल्लंघन केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तानी व काश्मिरी हे एकच लोक आहेत. आम्ही काश्मिरी लोकांना केव्हाही एकाकी पडू देणार नाही. त्यांच्या अश्रूंनी आमची हृदये हेलावत असल्याने त्यांचे दु:ख ते आमचेही दु:ख आहे. यापूर्वी आम्ही काश्मिरींच्या पाठीशी होता व यापुढेही त्यांच्या सोबतच राहू. भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात विनाकारण गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा करून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करतो, असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)काश्मीर प्रश्न सर्वत्र उपस्थित करीन - इम्रान खानआम्ही काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसह जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर उपस्थित करू आणि काश्मीरचा आवाज बनू, अशी शपथ पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी घेतली. आमचे लष्कर कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास तयार आहे, असे खान म्हणाले. काश्मीरमध्ये अशांतता असताना आंतरराष्ट्रीय समुदाय शांत बसल्याबद्दल खान यांनी प्रश्न उपस्थित केला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादेत विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना खान म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत यांच्यात जर युद्ध सुरू झाले तर त्याला जागतिक समुदायच जबाबदार असेल.
काश्मिरी आणि पाकिस्तानी एकच, त्यांच्या दु:खाने आम्हाला अश्रू, पाकचे राष्ट्राध्यक्ष आरिफ आल्वी यांची कुरापत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:08 AM