इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला कोणत्याही परदेशी नेत्यांना आमंत्रण करण्यात येणार नसल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ यांच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान यांचा शपथविधी 11 ऑगस्टला संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र इम्रान खान यांच्या खास मित्रांशिवाय इतर कोणत्याही परदेशी नेत्यांना आमंत्रण दिलं जाणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. ऐवान-ए-सद्रमध्ये (राष्ट्रपती निवासस्थान) 11 ऑगस्टला इम्रान खान पंतप्रधान पदाची शपथ घेतील. 'या कार्यक्रमाला कोणत्याही परदेशी नेत्याला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूर्णपणे राष्ट्रीय कार्यक्रम असेल. या सोहळ्याला इम्रान खान यांचे खास मित्र उपस्थित असतील,' असं चौधरी म्हणाले. या सोहळ्यासाठी खान यांच्याकडून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, नवजोत सिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खानला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. मात्र सिद्धू यांच्या अपवाद वगळता यातील कोणीही खान यांच्या निमंत्रणाविषयी जाहीर भाष्य केलेलं नाही. पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेले नवजोत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. इम्रान खान चारित्र्यसंपन्न व्यक्ती असून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता इम्रान त्यांच्याकडे आहे, अशी स्तुतीसुमनं सिद्धू यांनी उधळली आहेत. खेळाडू लोकांना एकत्र आणतात. भौगोलिक सीमांची बंधनं मोडून माणसांना एकत्र आणण्याचं कौशल्य खेळाडूंकडे असतं, अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी इम्रान खान यांचं कौतुक केलं.
ना मोदी, ना ट्रम्प, ना पुतीन... इम्रान खान यांच्या शपथविधीला एकही राष्ट्रप्रमुख नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 4:08 PM