पाकिस्तानातील सरकार बदलले असले, तरी परिस्थिती मात्र बदललेली दिसत नाही. तेथे अस्थिरतेचे वातावरण अद्यापही कायम आहे. पाकिस्तानातील सर्वसामान्यांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने ट्विट केले आहे. सध्या आपल्या देशात पेट्रोल आणि कॅशचा मोठा तुटवडा आहे, असे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने ट्विट करत म्हटले आहे.
मोहम्मद हफीज म्हणाला, 'लाहोरमधील कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, एटीएमवर कॅश नाही. राजकीय निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला हे सहन करावे लागत आहे.' महत्वाचे म्हणजे, मोहम्मद हाफीजने पंतप्रधान इम्रान खान, पंतप्रधान शहबाज शरीफ, मरियम नवाज शरीफ आणि बिलावल अली भुट्टो, यांना टॅग केले आहे.
मोहम्मद हफीजने याच वर्षी जानेवरी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अष्टपैलू हफीज जवळपास 18 वर्ष क्रिकेट खेळले आहे.
पाकिस्तानात परकीय चलनाचं संकट -सध्या पाकिस्तानात परकीय चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता तेल वाचवण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी करून, इंधन बचत करता येईल का, यावर सध्या पाकिस्तान सरकार विचार करत आहे. एवढेच नाही, तर असे केल्यास वर्षाला 2.7 अब्ज डॉलर एवढे परकीय चलन वाचवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
लावण्यात येत असलेल्या अंदाजानुसार, दर आठवड्याचा एक वर्किंग डे पाकिस्तानवर 642 मिलियन डॉलरचे ओझे टाकतो. यात मालवाहतूक आणि सामान्य वाहतूकीचा समावेश नाही.