लंडन : नोकरी, व्यवसायामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे तुम्हाला सक्तीने किंवा स्वत:च्या इच्छेने तासन्तास खुर्चीमध्ये बसून राहावे लागत असेल तरी तुमच्या प्रकृतीला काही त्यामुळे धोका आहे, असे समजायचे कारण नाही. पाच हजारपेक्षा जास्त लोकांच्या १६ वर्षे करण्यात आलेल्या एका अभ्यासात घरी किंवा कार्यालयात तासन्तास बसून राहणाऱ्यांच्या जीविताला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अॅक्सेटर आणि युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडनने हा अभ्यास केला. या ताज्या अभ्यासाच्या आधी करण्यात आलेल्या अशाच स्वरूपाच्या अभ्यासात तासन्तास खुर्चीमध्ये बसून राहणाऱ्यांना लवकर मृत्यूचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. हा ताजा अभ्यास त्या निष्कर्षाला खोडून काढत आहे. या विषयावर करण्यात आलेला हा अभ्यास सर्वाधिक प्रदीर्घ काळ चाललेला ठरला. अॅक्सेटर विद्यापीठातील क्रीडा आणि आरोग्य विज्ञान विभागातील डॉ. मेल्विन हिलस्डन म्हणाले की, एका जागी बसून राहिल्यामुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल सध्या जे सांगितले जाते त्याविरोधात जाणारा आमचा अभ्यास आहे. आरोग्याला धोका हा एका जागी बसून राहण्यामुळे नाही तर शरीराच्या हालचाली न होण्यामुळे आहे. शरीर स्थिर राहिल्यावर (तुम्ही बसलेले असा किंवा उभे) ऊर्जेचा वापर होत नाही आणि तेच आरोग्याला धोकादायक असते, असे ते म्हणाले. अभ्यासात ज्यांना सहभागी करून घेण्यात आले होते त्यांनी ते एकूण किती वेळ बसतात, बसण्याची पद्धत याची माहिती दिली. कार्यालयात बसणे, टीव्ही बघताना बसणे व टीव्ही न बघताना बसणे व रोज चालताना होणाऱ्या हालचालींची माहिती दिली. (वृत्तसंस्था)
बैठे कामाचा आरोग्याला नाही धोका
By admin | Published: October 14, 2015 11:37 PM