तेल अवीव : इस्रायलकडे टेहळणी, सुरक्षेसाठी असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेला व गुप्तचर खात्याला गुंगारा देऊन हमासच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून सीमा ओलांडून घुसखोरी केली. या हल्ल्याचा कोणताही सुगावा लागला का नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
इस्रायलची मोसाद तसेच देशांतर्गत सक्रिय असलेली शिन बेट या गुप्तचर यंत्रणेचे मोठे जाळे पॅलेस्टाइनचा प्रदेश, लेबनॉन, सिरिया व अन्य देशांत विणले आहे. मात्र, त्यातील एकाही गुप्तचराकडून हमासच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती इस्रायलला मिळाली नसावी किंवा माहिती मिळूनही इस्रायलच्या सरकारने ती फार गांभीर्याने घेतली नसावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.
सीमेवरील कुंपण कुचकामीइस्रायलने आपल्या सीमेवर मोठे कुंपण उभारले आहे, त्यांचे हजारो सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. मात्र, तरीही दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कोणाचे समर्थन, कोणाचा विरोध?- भारत, बेल्जियम, चेकिया (चेक प्रजासत्ताक), युरोपियन कमिशन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, जपान, पोलंड, स्पेन, युक्रेन, ब्रिटन, अमेरिका, नाटो आणि संयुक्त राष्ट्रे यांनी हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला. - इराण, कुवैत आणि कतार या देशांनी इस्रायललाच हल्ल्यासाठी जबाबदार धरले. - दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरात, तुर्कस्थान, सौदी अरेबिया, रशिया, इजिप्त आणि नाटो यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.