Israel Hamas War: इस्रायल-हमासमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही. गाझातून माघार घेणार नाही. गाझातील युद्धसंघर्षात शस्त्रसंधी करणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे.
गाझा पट्टीमध्ये इंधनाचा पुरवठा झाला नाही, तर सर्व सेवा कोलमडून पडतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाकडून देण्यात आला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे. हमासबरोबरचे युद्ध संपल्यानंतर गाझामधील एकंदर सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवरच असेल, असे नेतान्याहू यांनी सांगितले.
हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी आणखी पाच जणांची मुक्तता
हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी आणखी पाच जणांची मुक्तता केली. या दहशतवादी संघटनेने २४० जणांना ओलीस ठेवले आहे. याआधी हमासने जुडिथ रानान व त्यांची कन्या नताली यांची मुक्तता केली होती. दुसरीकडे, इस्रायल-हमास युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराक आणि सीरियामधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक आत्मघाती हल्ले झाले आहेत.
दरम्यान, गाझामधील पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम घ्यावा, असे आवाहन केले जात आहे, पण नेतान्याहू यांनी त्यास नकार दिला होता. तसेच उत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर तीन हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले. येथे अमेरिकन सैनिक आणि आंतरराष्ट्रीय सैनिक तैनात आहेत. इराकी कुर्दिस्तानच्या काउंटर टेररिझम सर्व्हिसने ही माहिती दिली आहे.