न्यू यॉर्क : गेले काही महिने सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनच्या असंख्य बालकांसह लाखो नागरिकांना निर्वासित व्हावे लागले आहे. रशियाचेपत्रकार दिमित्री मुरातोव यांनी आपल्याला शांततेसाठी मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव करून त्यातून मिळालेली ५ लाख डॉलरची रक्कम ते युक्रेनच्या बालकांच्या मदतीसाठी युनिसेफकडे सुपुर्द करणार आहेत. मुरातोव यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी नोवाया गॅझेट या वृत्तपत्राची स्थापना केली होती. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी तसेच पत्रकारांवर रशियाच्या सरकारने सुरू केलेली कारवाई पाहता ‘नोवाया गॅझेट’ हे वृत्तपत्र मुरातोव यांना गेल्या मार्च महिन्यात बंद करावे लागले होते. दिमित्री मुरातोव म्हणाले, युद्धामुळे युक्रेनमधील निर्वासित व्हावे लागलेल्या बालकांना सर्वांनी मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची गरज आहे. युक्रेनमधील संघर्षात जी बालके अनाथ झाली, त्यांची आपल्याला विशेष काळजी वाटते. या दुर्दैवी जीवांचे भविष्य अंधकारमय होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. रशियामध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना तसेच शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा आंतरराष्ट्रीय समुदायाने थांबवू नये, असे आवाहनही मुरातोव यांनी केले आहे. त्यांच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीचा लिलाव हेरिटेज ऑक्शन्स या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. (वृत्तसंस्था)
क्रिमियावरील आक्रमणाचा केला होता निषेधn२०१४ साली रशियाने क्रिमियावर आक्रमण करून तो भूभाग हडप केला होता. त्या कारवाईविरोधात रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव यांनी जोरदार आवाज उठविला होता.nदिमित्री मुरातोव व फिलिपाईन्सची पत्रकार मारिया रेसा यांना गेल्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता.