स्टॉकहोम : एरिक बेटझिग व विल्यम मोर्नर हे अमेरिकन व स्टीफन हेल या जर्मन शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी या तंत्रज्ञानाला रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शक) मधून दिसणाऱ्या वस्तू अधिक तपशीलात व अचूक दिसण्याचे नवे तंत्रज्ञान या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. या संशोधनामुळे पारंपरिक सूक्ष्मदर्शकातून सर्वाधिक विस्तारीत (रेझोल्युशन) तपशीलवार दृश्य पाहणे शक्य होणार आहे असे हा पुरस्कार जाहीर करणाऱ्या स्विडीश अकादमी आॅफ सायन्सेसने म्हटले आहे. हे संशोधन क्रांतिकारी असून त्याने मायक्रोस्कोपला नॅनो तंत्राशी जोडले आहे,असेही अकादमीने पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे. बेटझिग(५४) हे व्हर्जिनियातील अॅशबर्न येथे हॉवर्ड वैद्यकीय संस्थेत काम करतात. स्टीफन हेल(५१) हे जर्मनीतील गोएटिंजेन येथील मॅक्सप्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिकल केमिस्ट्री या संस्थेत संचालक आहेत. विल्यम मोएर्नर (६१) हे कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. मायक्रोस्कोपला दीर्घकाळ प्रकाशलहरींची मर्यादा होती. त्यामुळे त्यांचे रिझोल्युशन ०.२ एवढेच होते. पण फ्लुरोसेंट अणू वापरुन या तीन शास्त्रज्ञांनी रिझोल्युशनची ही मर्यादा ओलांडण्यात यश मिळवले. त्यामुळे मायक्रोस्कोपचे जग बदलले असून, सूक्ष्मदर्शकातून आता पेशींच्या आतील सूक्ष्म रेणू पाहणे शक्य होणार आहे. याचा लाभ रोगबाधित पेशीत असणाऱ्या प्रथिनांचा अभ्यास करताना होईल. जीवनाचे अगदी सूक्ष्म घटक पाहण्याकरिता पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांनी या तंत्राचा वापर केला आहे. हेल यांनी मेंदूची रचना पाहण्याकरीता मेंदूतील रक्तवाहिन्यातील पेशींचा अभ्यास केला. मोएर्नर यांनी हटिंग्टन डिसीज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोगातील बाधित पेशीमधील प्रथिनांचा अभ्यास केला. बेटझिग यांनी गर्भातील पेशींचे विभाजन कसे होते याचा जो अभ्यास केला त्याचा अकादमीने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. (वृत्तसंस्था)
मायक्रोस्कोपला नवी दृष्टी देणाऱ्यांना रसायनशास्त्राचे नोबेल
By admin | Published: October 09, 2014 3:21 AM