स्टॉकहोम : अमेरिका, जपान आणि चीनच्या तीन शास्त्रज्ञांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. दरवर्षी हिवताप (मलेरिया) आणि उष्णकटिबंधातील इतर आजारांनी कित्येक दशलक्ष लोकांचे जीव घेणाऱ्या आजारांना तोंड देणाऱ्या औषधांना शोधल्याबद्दल या तिघांना हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.नोबेल पुरस्काराच्या परीक्षक मंडळाने स्टॉकहोममध्ये अमेरिकेचे विल्यम कॅम्पबेल (८५), जपानचे सॅतोशी ओमुरा (८०) आणि चीनचे तू यूयू (८४) यांना हा पुरस्कार जाहीर केला. कॅम्पबेल यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला असून १९६२ मध्ये ते अमेरिकेचे नागरिक झाले. चीनच्या शास्त्रज्ञाला वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रथमच नोबेल जाहीर झाले आहे. विल्यम कॅम्पबेल आणि ओमुरा यांनी शोधलेल्या औषधामुळे रिव्हर ब्लार्इंडनेस व लिम्फॅटिक फिलारिसिस या दोन आजारांमुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण कमी होईल.अशिया आणि अफ्रिकेमध्ये कित्येक लाख लोकांना परोपजीवी किड्यांमुळे हे दोन आजार होतात. तू यूयू यांनी शोधलेल्या अर्टेमिसिनिन औषधामुळे हिवतापाच्या रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यास मदत होणार आहे. या दोन शोधांमुळे या आजाराला तोंड देण्यासाठी नवे शक्तीशाली साधन मानवजातीच्या हाताशी आले आहे. कारण दरवर्षी शेकडो लक्षावधी लोकांना या आजारांचा फटका बसत असतो, असे निवड समितीने म्हटले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार रिव्हर ब्लार्इंडनेस हा डोळा आणि कातडीला होणारा आजार असून त्यामुळे रुग्ण पूर्णपणे आंधळा होऊ शकतो. या आजाराचे ९० टक्के रुग्ण हे अफ्रिकेत आढळतात. लिम्फॅटिक फिलारियासिसमुळे अवयव आणि लिंगांना सूज येऊ शकते. याला हत्तीरोगही म्हणतात. या रोगाचा प्रामुख्याने धोका आहे तो अफ्रिका आणि अशियात.
वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर
By admin | Published: October 06, 2015 4:31 AM