Dr. Mohammed Yunus : बांगलादेशमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर हसीना यांनी देश सोडला आणि ढाकाहून आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आहेत. बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम पंतप्रधानपदाची शर्यत अधिक तीव्र झाली आहे. या शर्यतीत नोबेल पारितोषिक विजेते डॉ मोहम्मद युनूस यांचे नाव आघाडीवर आहे.
डॉ मोहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार असणार आहे. विद्यार्थी चळवळीच्या प्रमुख संयोजकांनी रविवारी नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांचे नाव अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून प्रस्तावित केले होते. विद्यार्थी आंदोलनाच्या मुख्य संयोजकांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लामने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिली होती.
विद्यार्थी चळवळीचे प्रमुख नाहीद इस्लाम यांनी मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. देशाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनीही याला संमती दिली आहे. तसेच खालिद झिया यांचा मुलगा तारिक रहमान हेही अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटलं जात आहे. ज्येष्ठ वकील सारा हुसेन, निवृत्त थ्री स्टार जनरल जहांगीर आलम चौधरी आणि बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सालेहुद्दीन अहमद हेही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहेत मोहम्मद युनूस?
२८ जून १९४० रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.
भारतावर केली होती टीका
सरकार कोसळण्याच्या आदल्याच दिवशी मोहम्मद युनूस यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आंदोलनाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक् केली. भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. "ही देशांतर्गत बाब असल्याचे भारत म्हणतो तेव्हा मला वाईट वाटते. तुमच्या भावाच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही त्याला घरगुती बाबीबद्दल कसे सांगाल? अनेक गोष्टी मुत्सद्देगिरीत येतात आणि हा त्यांचा देशांतर्गत मुद्दा आहे असे म्हणता येणार नाही. बांगलादेशातील अशांतता शेजारील देशांमध्येही पसरू शकते," असे मोहम्मद युनूस यांनी म्हटलं होतं.