स्प्रिंगफील्ड : सोमवारपासून बेपत्ता असलेले नोबेल पुरस्कार विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ एई-ईची नेगिशी इलिनॉय राज्याच्या उत्तरेकडील ग्रामीण भागात वाट चुकून भरकटलेले सापडले. त्यांच्या पत्नीचा मृतदेहही तेथून जवळच आढळून आला. नेगिशी यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल केले गेले आहे. पत्नीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.सन २०१० मध्ये नोबेल मिळालेले ८३ वर्षांचे नेगिशी इंडियाना राज्यात पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या दाम्पत्याचे कॅम्पसजवळच येथे घर आहे. प्रा. नेगिशी मंगळवारी पहाटे इलिनॉय राज्यात रॉकफर्डजवळ भरकटून फिरत असताना आढळले. त्यांची पत्नी सुमिरे यांचा मृतदेह ओचार्ड हिल्स लॅँडफिल येथे आढळून आला, असे शेरीफ कार्यालयाने सांगितले.त्यांच्या मृत्यूमागे पोलिसांना तूर्तास तरी घातपाताचा संशय व्यक्त केलेला नाही. या दाम्पत्याचा शोध इलिनॉय पोलीस घेत होते. प्रा. एई-ईची नेगिशी जिथे सापडले, ते ठिकाण त्यांच्या घरापासून ३२० मैल इतके दूर आहे. (वृत्तसंस्था)
नोबेल विजेता शास्त्रज्ञ वाट चुकून भरकटला, पत्नी मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:44 AM