स्टॉकहोम : युद्ध काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढणारे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इसिसने केलेले अपहरण व अत्याचार यांचा सामना करून त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर याच कारणांसाठी लढणा-या नादिया मुराद या दोघांना संयुक्तरीत्या यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.युद्ध व संघर्षाच्या काळात होणारे लैंगिक शोषण थाबावे, यासाठी या दोघांनी केलेल्या कार्याबद्दल त्याचा गौरव केला जात आहे. डॉ. डेनिस मुक्वेगे हे कांगोतील असून, नादिया मुराद या इराकमधील याझ्दी कुर्दिश वंशाच्या आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी, त्या १९ वर्षांच्या असताना इसिसच्या अतिरेक्यांनी त्यांच्या गावावर हल्ला चढवून ६00 लोकांना ठार केले होते. त्यात नादिया यांचे नातेवाईकही होते. त्यानंतर अतिरेक्यांनी नादियासह ६५00 महिलांचे अपहरण केले.नादिया यांच्यासह या गुलाम बनवण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार, मारहाण, सिगारेटचे चटके देणे आणि अनन्वित अत्याचार करण्यात आले. संधी मिळताच तेथून पळून आलेल्या नादिया यांनी सातत्याने महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला आणि प्रयत्नही केले. त्या २५ वर्षांच्या आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघासमोर त्यांनी महिलांवर युद्ध व सशस्त्र संघर्षाच्या काळात होणा-या अत्याचाराचे चित्र उभे केले आणि त्याविरोधात उभे राहण्याचे आवाहनही केले.
डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 3:39 PM