Nobel Peace Prize ( Marathi News ) : जपानमधील हिरोशिमा आणि नाकासाकी या शहरांवर १९४५ साली झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यांनंतर अण्वस्त्र वापराविरोधात काम करणाऱ्या निहोन हिदांक्यो (हिबाकुशा) संस्थेला नोबेल शांतता पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. जपानवर झालेल्या हल्ल्यातून वाचलेल्या काही लोकांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली होती. निहोन हिदांक्यो या संस्थेच्या सन्मानाने जगभरातील अण्वस्त्रविरोधी नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल पारितोषिक समितीनं म्हटलं आहे की, "अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, मात्र जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल."
कशी काम करते ही संस्था?
निहोन हिंदांक्यो संस्थेची स्थापना १९५६ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीच्या हल्ल्यातून वाचलेल्या नागरिकांनी केली होती. शांततेचा संदेश देण्यासह अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी, अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी आणि हिरोशिमा व नागासाकीच्या शोकांतिकेची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये ही संघटना महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. बॉम्बस्फोटांमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्याचं कामही संस्थेकडून केलं जातं.