बर्मिंगहॅम : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई (Nobel Peace Prize laureate Malala Yousafzai) लग्नबंधनात अडकली आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये असर मलिक (Asser Malik) यांच्यासोबत तिने लग्न केले. मलाला युसूफझाईने ट्विटद्वारे ही माहिती दिली. बर्मिंगहॅम येथील निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान दिवस असल्याचे मलाला युसूफझाईने म्हटले आहे.
मलाला युसूफझाईने ट्विट केले की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभरासाठीचे जोडीदार होण्यासाठी लग्नगाठ बांधली.' तसेच, तिने लग्न समारंभातील काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. मात्र, तिने आपल्या पतीबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. दरम्यान, असर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक आहेत. मलाला युसूफझाईचा जगाच्या अनेक भागात आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये तिच्या निर्भयपणामुळे आणि महिलांच्या हक्कांसाठी काम केल्याबद्दल आदर केला जातो. मात्र, त्याच्या पाकिस्तानात तिच्या कामाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत.
2012 साली 15 वर्षांची असताना मुलींच्या शिक्षण हक्काबद्दल पाकिस्तानमध्ये बोलल्याप्रकरणी मलाला युसूफझाईला तालिबानने लक्ष्य केले होते. तालिबानी कट्टरतावाद्याने स्वात खोऱ्यातल्या मलाला युसूफझाईच्या स्कूलबसमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मलाला युसूफझाईसह तिच्या मैत्रिणीही जखमी झाल्या होत्या. जीवावर बेतलेल्या अशा प्रसंगातून बरी झाल्यानंतर मलाला युसूफझाई आणि तिच्या घरचे इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे स्थायिक झाले. वयाच्या 17 व्या वर्षी तिला नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मलाला युसूफझाई सगळ्यांत लहान वयाची नोबेल पुरस्कारविजेती ठरली होती.
तीन महिन्यांपूर्वीच लग्नावर प्रश्न उपस्थित केले होतेया वर्षी जुलैमध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलाला युसूफझाईने विवाह पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले होते. व्होग या ब्रिटीश मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, "लोकांना लग्न का करायला लागते हे समजत नाही. जर तुम्हाला आयुष्यासाठी जोडीदार हवा असेल तर तुम्हाला कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या का कराव्या लागतात? तुमचे सहजीवन असेच का सुरू होऊ शकत नाही?". दरम्यान, मलाला युसूफझाईच्या या विधानावर पाकिस्तानमधून जोरदार टीका झाली.