नवी दिल्ली: परवा वैद्यकशास्त्रातील आणि काल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता आज रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अॅसिमेट्रिक ऑर्गेनकॅटालिसस क्षेत्रातील संशोधनासाठी बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन यांना यंदाचा रसायन शास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे.
मॉलिक्यूलर कंस्ट्रक्शनसाठी तयार केले नवीन उपकरण
जर्मनीच्या बेंजामिन लिस्ट आणि अमेरिकेच्या डेव्हिड डब्ल्यूसी मॅकमिलन यांनी मॉलिक्यूलर कंस्ट्रक्शनसाठी एक अचूक आणि नाविन्यपूर्ण उपकरण विकसित केलं आहे. या उपकरणाचा औषधाच्या संशोधनावर मोठा परिणाम झाला आहे. रसायनशास्त्रज्ञांसाठी उत्प्रेरक हे मूलभूत साधन आहे, परंतु संशोधकांचा बराच काळ असा विश्वास होता की, तत्त्वानुसार केवळ दोन प्रकारचे उत्प्रेरक उपलब्ध आहेत. यापैकी पहिला एक धातू आणि दुसरा एंजाइम. पण, 2000 मध्ये बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांनी तिसऱ्या प्रकारचे उत्प्रेरक विकसित केले. याला अॅसममित ऑर्गनोकॅटालिसिस म्हणतात.
मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा
मंगळवारी, 2021 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्युकुरो मनाबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना देण्यात आला आहे. हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी या तिघांना नोबेल जाहीर झाला आहे. तर, सोमवारी अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि अद्रेम पटापाऊटियन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.