जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. अमेरीकेतील डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2021 जाहीर झाला आहे. शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन्ही शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.
स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील एका पॅनेलद्वारे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी वैद्यकशास्त्रात हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधासाठी देण्यात आला होता. त्या शास्त्रज्ञांनी यकृताला हानी पोहोचवणाऱ्या हिपॅटायटीस सी विषाणूचा शोध लावला होता.
हे आहे नोबेलचे स्वरुपप्रतिष्ठित नोबेल पुरस्कारात सुवर्णपदक दिले जाते. तसेच, एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजेच 8.50 कोटी रुपये दिले जातात. बक्षिसांची रक्कम अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यूपूर्वी तयार केलेल्या मृत्यूपत्रातून येते. 1895 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते. येत्या आठवड्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील पुरस्कारही जाहीर केले जातील.