नवी दिल्ली: पत्रकार मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रेसा यांना फिलीपाईन्स आणि दिमित्री यांना रशियात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेल्या कामांसाठी यंदाचा शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे.
रेसा न्यूज वेबसाईट रॅपलच्या सह-संस्थापक आहेत. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून फिलिपिन्समधील सत्तेचा गैरवापर उघडकीस आणल्याबद्दल ओळखले जाते. तर, मुरातोव्ह मागील चोवीस वर्षांपासून स्वतंत्र वृत्तपत्र नोवाजा गॅझेटाचे सह-संस्थापक आहेत. रशियातील वेगाने बदलणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण केलं आहे.
शांततेसाठी नोबेल
तुम्हाला माहित असेलच की नोबेल पुरस्कारांची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सकडून केली जाते. पण, शांततेच्या नोबलची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमीकडून न होता नॉर्वेजियन संसदेनं निवडलेल्या समितीद्वारे केली जाते. भारताच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान देणाऱ्या महात्मा गांधींना 1937, 1938, 1939 आणि 1947 अशा चारवेळा शांततेच्या नोबेलसाठी नामांकित करण्यात आलं होतं. पण, त्यांना कधीच नोबेल पारितोषिक मिळालं नाही.
नोबेल पुरस्काराची सुरवात कशी झाली
नोबेल पुरस्कार नोबेल फाउंडेशनने 1901 मध्ये सुरू केला होता. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. मानवजातीसाठी मोठं योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे.