नवी दिल्ली: काल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज भौतिक शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली आहे. हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी भौतिकशास्त्रातील 2021 चे नोबेल पारितोषिक सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना देण्याची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकन शास्त्रज्ञ आंद्रेया गेझ, ब्रिटनचे रॉजर पेनरोज आणि जर्मनीचे रेनार्ड गेन्झेल यांना देण्यात आला होता. कृष्णविवरांवर संशोधन केल्याबद्दल त्या तिघांचा नोबेलने गौरव करण्यात आला होता. विजेत्यांना 1.14 मिलीयन डॉलर रोख रकमेसह सुवर्णपदक दिले जाते.
वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीरसोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि अद्रेम पटापाऊटियन यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. तापमान आणि स्पर्शासाठी 'रिसेप्टर्स'च्या शोधासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. 'रिसेप्टर्स'द्वारेच आपल्याला तापमान आणि स्पर्शाची जाणीव होते. दोन्ही शास्त्रज्ञांच्या अभ्यासाने 'सोमाटोसेन्सेशन' क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा आपल्या डोळे, कान आणि त्वचा यासारख्या विशिष्ट अवयवांच्या क्षमतेशी संबंध आहे.