नवी दिल्ली : यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सिस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना रसायनशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.
'द रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेकडून बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. फ्रान्सिस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फ्रान्सिस एच. अरनॉल्ड या रसायनशास्त्राचा पुरस्कार जिंकणाऱ्या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत. त्यांना नोबेल पुरस्काराच्या रकमेतील अर्धा हिस्सा म्हणजेच एक दशलक्ष डॉलर इतकी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. तर उर्वरित रक्कम जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना विभागून दिली जाणार आहे.
गेल्या वर्षीचा म्हणजेच, 2017 सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॅकस डुबोचेट, जोकीम फँक आणि रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला होता.
दरम्यान, काल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्लन्ड यांना जाहीर झाला आहे. भौतिकशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. या तिन्ही वैज्ञानिकांनी लेजर तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमूल्य संशोधन केले आहे.
त्याआधी सोमवारी, मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी 2018 च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.