स्टॉकहोम - यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर झाला आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचानोबेल पुरस्कार पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकारजुक यांना जाहीर झाला आहे. तर 2019 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने साहित्य क्षेत्रातील पुरस्कारासंबंधी गुरुवारी (10 ऑक्टोबर) ट्विट करुन माहिती दिली आहे.
ओल्गा तोकारजुक या पोलंडच्या लेखिका आणि कार्यकर्त्या आहेत. 2018 मध्ये ओल्गा यांना त्यांच्या फ्लाइट्स या कादंबरीसाठी 'मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज' ने सन्मानित करण्यात आलं आहे. 2018 या वर्षासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार ओल्गा यांना जाहीर झाला आहे. तसेच साहित्यिक आणि अनुवादक पीटर हँडके यांना 2019 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
पीटर यांनी आईच्या आत्महत्येवरून पुस्तक लिहिलं आहे. आईच्या आत्महत्येनंतर त्यांनी 'द सॉरो बियॉड ड्रीम्स' हे पुस्तक लिहिलं. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला 1978 च्या कान फेस्टिवल आणि 1980 च्या गोल्ड अवॉर्डमध्ये नामांकन मिळालं होतं. वैद्यकशास्त्र विभागात तीन शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर झाला आहे. विल्यम जी. केलिन ज्युनियर, सर पीटर जे. रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंजा या तिघांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. पेशींकडून ग्रहण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा शोध लावल्यानं या शास्त्रज्ञांचा गौरव होणार आहे.
नोबेल पुरस्कार समितीनं शरीरशास्त्रातील पुरस्कारासंबंधीची माहिती ट्विट करुन दिली. यंदा तीन जणांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर झाला. पेशींची कार्यपद्धती आणि त्यांच्याकडून केलं जाणारं ऑक्सिजन ग्रहण याविषयी केलेल्या संशोधनासाठी तिन्ही वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल सर पीटर जे. रॅटक्लिफ यांनी आनंद व्यक्त केला. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते ईयू सिनर्जी ग्रँट ऍप्लिकेशनमधील त्यांच्या डेस्कवर काम करत होते.
अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम जी. केलिन ज्युनियर यांचा जन्म 1957 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी डरहम विद्यापीठातून एमडीची पदवी घेतली आहे. बाल्टिमोर के. जॉन हॉपकिंग्स विद्यापीठ आणि बोस्टनच्या दाना-फार्बर कर्करोग संस्थेतून त्यांनी इंटर्नल मेडिसीन आणि ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. सर पीटर जे. रॅटक्लिफ यांचा जन्म इंग्लंडमधील लँकशायरमध्ये 1954 मध्ये झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या गोन्विले आणि साइअस महाविद्यालयातून औषधांचा अभ्यास केला आहे. यासोबतच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून नेफ्रोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आहे. ग्रेग एल. सेमेंजादेखील न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1956 साली झाला. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून बायोलॉजी विषयामधून पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी पेन्सिवेनिया विद्यापीठातून त्यांनी एमडी/पीएचडीदेखील घेतली आहे.