स्टॉकहोम : फ्रेंच लेखिका ॲनी एरनॉक्स (८२ वर्षे) यांना यंदाचा साहित्याविषयक नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची बहुतांश पुस्तके आत्मचरित्रात्मक व समाजशास्त्रावर आधारित आहेत. त्यांनी २०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात त्यांच्या आयुष्यातील छोट्या- छोट्या प्रसंगांचे वर्णन आहे.
साहित्यविषयक नोबेलच्या समितीचे अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी सांगितले की, एरनॉक्स यांनी लेखनशैली साधी व मनाला भिडणारी आहे. ला प्लेस (ए मॅन्स प्लेस) या पुस्तकाने ॲनी एरनॉक्स यांना खूप नाव मिळवून दिले. त्या पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा जिव्हाळा उलगडून दाखविला आहे. लेस ॲनीज (दी इयर्स) हे पुस्तक त्यांनी २००८ साली लिहिले. दुसरे महायुद्ध संपुष्टात आल्यापासून ते एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंतचा पट ॲनी एरनॉक्स यांनी त्यात उलगडून दाखविला आहे. या कालावधीत फ्रान्समधील नागरिकांना कोणत्या स्थितीतून जावे लागले याचे वर्णन या पुस्तकात आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. ॲनी एरनॉक्स यांनी १९७४ सालापासून लेखनाला प्रारंभ केला.
१९८४ साली त्यांच्या ला प्लेस पुस्तकाला रेनोडॉट पुरस्कार मिळाला. त्यांनी कालांतराने कादंबरी लेखनापेक्षा आत्मचरित्रात्मक लिखाण करणे अधिक पसंत केले. अशा प्रकारचे लेखन करताना ॲनी एरनॉक्स यांनी मानवी मनाच्या विविध पैलूंचा शोध घेतला. त्यातले विविध कंगोरे आपल्या लेखनातून उलगडून दाखविले. कोणत्याही भावभावनांच्या मुळाशी जाऊन त्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न ॲनी एरनॉक्स यांनी आपल्या लेखनातून केला. (वृत्तसंस्था)
मोजके व आशयघन लेखन
ॲनी एरनॉक्स यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यांनी साहित्य या विषयात पदवी शिक्षण घेतले. त्या साहित्य विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मोजके; पण, आशयघन लेखन करणाऱ्या लेखिका अशी ॲना एरनॉक्स यांची साहित्यविश्वात ओळख आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"