स्टॉकहोम, दि.4- यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची परवापासून घोषणा होत आहे. काल पदार्थविज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज रसायनशास्त्राचे नोबेल सन्मान जाहीर करण्यात आले. ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांनी, पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या संशोधनामुळे संशोधकांना जैवरेणू गोठवून अभ्यास करणे सोपे जाणार आहे.
1901 पासून आजवर रसायनशास्त्रासाठी 108 नोबेल पुरस्कार जाहीर झाले, यामध्ये 175 वैज्ञानिकांचा सन्मान करण्यात आलेला आहे. या पुरस्कारांची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्समध्ये करण्यात आली. नोबेल पुरस्कार ज्याच्या नावाने देण्यात येतो तो आल्फ्रेड नोबेल स्वतः रसायनशास्त्रज्ञच होता. डायनामाईटच्या शोधाचे त्याने 1867 साली पेटंट घेतले, त्यामुळे त्याची चांगली भरभराटही झाली. मात्र काही काळानंतरच त्याचे दुष्परिणाम व दुरुपयोग होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या. आल्फ्रेडच्या भावासह अनेक लोकांचा एका कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. अशा अनेक घटना त्याचे विचार बदलण्यासाठी कारणीभूत ठरल्या.