ऑनलाइ लोकमत
वॉशिंग्टन, दि. २७ - अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच भारताची स्तुती केली असून ' भारत चांगली कामगिरी करत असून, त्याबद्दल बोलताना कोणीच दिसत नाही' असे म्हटले आहे. मुस्लिमांनी अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी लादण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ट्रम्प चांगलेच चर्चेत आले होते. त्याच ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात चीन, जपान आणि मेक्सिकोवर बरीच टीका केली. पण सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारताबद्दल पहिल्यांदाच बोलताना ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आहे.
' सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेचा एकेकाळी जगभरात सन्मान होत असे, पण आता परिस्थिती बदलली असून ही खूप दु:खद बाब आहे. सध्या जगभरात अमेरिकेची चेष्टा होताना दिसत आहे. सध्या लोक अचानक चीन, भारत आणि इतर देशांबद्दल चर्चा करताना दिसतात, आर्थिक दृष्टिकोनातूनही त्यांच्याबद्दल बोलत असतात. सध्या भारत चांगली कामगिरी करत आहे, तिथे नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण भारताच्या कामगिरीबद्दलकोणीच बोलत नाही,' असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे दरवाजे बाहेरच्या देशातल्या मुस्लीमांसाठी काही काळासाठी बंद करावेत असा वादग्रस्त तोडगा दहशतवादाशी लढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला होता.