वॉशिंग्टन : कृष्णवर्णीयाच्या पोलीस कोठडीतील मृत्यूवरून अमेरिकेत प्रचंड जाळपोळ, दंगल सुरु आहे. यामध्ये आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उडी घेतली आहे. गेले काही महिने कठीण आणि निराशाजनक गेले असले तरीही तरुणांची आंदोलनातील वाढलेली सक्रियता मोठा बदल घडविण्याची शक्यता ओबामा यांनी व्यक्त केली आहे.
आपण आपला न्यायासाठीचा राग शांत ठेवून तो जास्त काळ टिकविला तर कार्यप्रणालीमध्ये बदल घडवू शकणार आहोत. जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूच्या न्यायासाठी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले आहेत आणि आवाज उठवत आहेत. मात्र, खरा बदल घडण्यासाठी आपण ही चळवळ कशी सुरु ठेऊ शकणार आहोत, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. मी यासाठी काही सूचना करेन असे ओबामा यांनी सांगितले.
आज सुरु असलेले हे निषेध आंदोलन न्यायव्यवस्था गेल्या काही दशकांपासून अपयशी ठरल्याचे आणि पोलिसांविरोधातील रोष दर्शविणारे आहे. हिंसाचाराचा मार्ग निवडणाऱ्यांचा आपण निषेध करायलाच हवा. मात्र, काही जण शांततेत आंदोलन करत आहेत ते समर्थनास पात्र, असल्याचे ओबामा म्हणाले.
आंदोलनाचा मुख्य उद्देश हा जनजागृती करणे, अन्यायावर लक्ष केंद्रित करणे असा आहे. पण जे अपेक्षित असते ते विशिष्ट कायद्यांमध्ये आणि संस्थात्मक प्रणालीमध्ये प्रत्यक्षात आणावे लागणार आहे. हे घडवून आणण्यासाठी सरकारच्या कोणत्या स्तरांवर सर्वात जास्त परिणाम होतो हे आम्हाला माहित असले पाहिजे. फेडरल सरकार बदलणे महत्वाचे आहेच, पण पोलीस विभाग आणि गुन्हेगारी व्यवस्थेत सुधारणा करणेही तेवढेच गरजेचे आहे, असे ओबामा म्हणाले.
यामुळे जर आपल्याला प्रत्यक्षात बदल आणायचा असेल तर आपल्याला आंदोलन आणि राजकारणापैकी एक निवडायचे नाही. दोन्ही निवडावे लागेल असे ओबामा यांनी सांगितले. जनजागृती करण्यासाठी एकत्र जावे लागेल. तसेच सुधारणावादी उमेदवारांची निवड करावी लागेल. त्यासाठी आपली मतेही ठरवावी लागतील असे ओबामा म्हणाले.